Friday, November 2, 2018

बेकायदा फ्लेक्सचानगरसेविकेला फटका

महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मोठा फ्लेक्स लावणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेला चांगलेच महागात पडले आहे. बेकायदा पद्धतीने फ्लेक्स लावण्यात आल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित नगरसेविकेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शिवाजीनगर पोलिसांना दिले आहे. येरवडा तसेच ढोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने असे पत्र पोलिसांना दिले आहे.

पीएमपी प्रशासनाचीटाटा कंपनीकडे विचारणा

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला आग लागण्याच्या १७ घटना गेल्या दोन वर्षांत घडल्या असून, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सर्व बस या टाटा कंपनीच्या असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाकडून टाटा कंपनीला विचारणा करण्यात येणार असून, 'पीएमपी'च्या ताफ्यातील टाटा कंपनीच्या सर्व बसची तपासणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

पाणीटंचाईतही सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामांचा धडाका

शहरातील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला जात असला, तरी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होणार असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. नागरिकांची मागणी नसतानाही गल्लीबोळात सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते करण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा धडाका कायम राहिला असून रस्ते काँक्रिटीकरणाच्या तब्बल २५० ते ३०० कामांच्या निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काहींना मंजुरी मिळाली असून रस्त्याच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होणार असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

हडपसरपर्यंत धावणार पुणे मेट्रो-मुख्यमंत्री

पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. त्यातील एक टप्पा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार आहे. मात्र आता हडपसर पर्यंत ही मेट्रो धावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हडपसर येथील कार्यक्रमात  केली.

जवानांसाठी महापालिकेतर्फे फराळाची भेट

पुणे : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणार्‍या लष्करी जवानांसाठी खास दिवाळीच्या फराळाची अनोखी भेट महापालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचार्‍यांनी पाठविली आहे. मराठा बटालियनच्या युनिट-18साठी भोर गावचे मराठा बटालियनमधील जवान तुषार शेटे यांच्या माध्यमातून बुधवारी हा फराळ पाठविण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसचिव सुनील पारखी, उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे, नगरसेवक सचिन दोडके यावेळी उपस्थित होते.

स्वच्छतागृहे झाली गोदामे, आरटीओ कार्यालयातील भिषण चित्र

पुणे : पुरुष आणि महिलांच्याही स्वच्छतागृहात फायलींनी भरलेल्या गोणपाटांच्या थप्प्या, टाकून दिलेल्या जुन्या खुर्च्या, मोडतोड झालेले फर्निचर, फुटलेले बेसिन अन्‌ तुटलेले भांडे... हे चित्र आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वच्छतागृहाचे. परिवहन कार्यालयात एकूण आठ स्वच्छतागृह असून, त्यातील दोनच सध्या सुरू आहेत. अन्य सहा स्वच्छतागृहांमध्ये कार्यालयातील जुनी कागदपत्रे ठेवलेली आहेत. 

पुणेकरांना केवळ 1 हजार 'एमएलडी' पाणी

पुणे : गळती रोखल्यास दीडशे "एमएलडी' पाण्याची बचत होईल आणि त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी पुरविणे शक्‍य होईल, हा महापालिका आयुक्तांचा दावा पाणीकपात लागू झाल्यानंतर चार दिवसांतच फोल ठरला आहे. संपूर्ण शहराला पुरेशा दाबाने पाणी देण्याची योजना फसली असून, पेठांसह बहुतांशी भागांत दीड-दोन तासही पाणी येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

वस्त्यांमधील बालविवाह उच्चाटनासाठी प्रयत्नशील राहणार : डॉ. सिध्दार्थ धेंडे

येरवडा : महापालिकेच्या सामाजविकास विभागाच्यावतीने शहरातील वस्त्यांमध्ये बालविवाह विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. शेजारसमुह, स्वयंसहाय्यता बचत गट, संयोगिनींच्या माध्यमातून शहरातील बालविवाहाचे उच्चाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. 
विश्रांतवाडी चौकातील मुुकुंदराव आंबेडकर चौकात निर्माण बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने बालविवाह विरोधी अभियानाची सुरवात करताना डॉ. धेंडे बोलत होते. यावेळी निर्माण संस्थेचे वैशाली भांडवलकर, संतोष जाधव, युनिसेफचे प्रतिनिधी जयंत पवळीकर, माजी नगरसेवक सतिश म्हस्के, सुनिल सांळुखे उपस्थित होते.

पगार वेळेत झाल्याने आनंदाचे वातावरण

पुणे – सण असो किंवा पैशांची अडचण, कधीही वेळेत पगार झालेच नाही. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेलाच जिल्हा परिषदेतील वर्ग तीन आणि चार संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्लॅस्टिक, ई-कचरा संकलन मोहीम

पुणे : दिवाळीनिमित्त घरोघरी सफाईचे काम मोठ्या प्रमाणात होत असते. यानिमित्ताने नको असलेल्या वस्तू, प्लॅस्टिक आणि ई-कचरा मोठ्या प्रमाणात बाजूला काढला जातो. मात्र, त्याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया आणि पूर्णम इकोव्हीजन या संस्थांतर्फे संयुक्तपणे प्लॅस्टिक आणि ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली.