Monday, September 17, 2018

रेल्वेचा ‘हॉर्न’ करतोय निद्रानाश...

पुणे - ‘रात्री रेल्वेच्या ‘हॉर्न’ने मी अनेकदा दचकून उठते.. अचानक झालेल्या आवाजाने खूप भीती वाटते.. रडायलाही येतं.. त्यामुळे नीट झोपही लागत नाही...  अभ्यास करताना अनेकदा रेल्वेच्या आवाजाने अभ्यासात लक्ष लागत नाही..’  हे सांगतेय इयत्ता पाचवीत शिकणारी श्रीया सूर्यवंशी!
बीटी कवडे रस्ता, सोपानबाग, हडपसर औद्योगिक वसाहत, घोरपडी आणि वानवडीचा काही भाग लोहमार्गालगत आहे. सुमारे ५० हजार नागरिक तेथे राहतात. ही वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सोपान बागेशेजारी राहणाऱ्या श्रीयाच्या घराजवळून लोहमार्ग जातो. पूर्वी येथे रेल्वेचे फाटक होते; पण येथे उड्डाण पूल झाल्यावर ते फाटक बंद करण्यात आले. लोहमार्गाच्या दुतर्फा संरक्षक भिंतही बांधण्यात आल्या आहेत. तरी येथे रेल्वे गाड्यांकडून हॉर्न वाजवला जातो. प्रत्यक्षात, ज्या ठिकाणी फाटक नाही, त्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यास बंदी आहे. या ठिकाणचे फाटक बंद केल्यानंतरही या मार्गावरून जाणाऱ्या गोवा एक्‍स्प्रेस, महालक्ष्मी एक्‍स्प्रेस, महाराष्ट्र एक्‍स्प्रेस, सह्याद्री एक्‍स्प्रेस, कोयना एक्‍स्प्रेस तसेच मालवाहतूक करणाऱ्या गाड्याही हॉर्न वाजवतात. सुमारे ५० गाड्यांची रोज येथून वाहतूक होते. त्याचा त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच होतो. गाड्यांची वाहतूक रात्री जास्त होते. त्यामुळे लहान मुलांची झोप मोडते, काही नागरिकांचा रक्तदाब वाढतो. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडथळे येतात. 

No comments:

Post a Comment